छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील 10 रस्त्यांवर मनपाकडून बुलडोझर चालविण्यात येतआहे. त्यासाठी रीतसर भूसंपादनाची प्रक्रिया राबवून दहा रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येतआहे. आज सकाळपासून पैठण गेट येथील अतिक्रमण पाडण्यास पोलिसांच्या चोख बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे.
पैठन गेट येथे काही दिवसापूर्वी एका युवकाचा खून झाला. त्यानंतर काही नागरिकांनी या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाची तक्रार मनपा कडे केली होती. त्यानंतर मनपाने सदरील ठिकाणी पाहणी करून मोजणी केली. व अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते. आज सकाळी मनपा उपायुक्त संतोष वाहूले संजय सुरडकर, सय्यद जमशेद यांच्या उपस्थितीत कारवाईला सुरुवात केली.
वारंवार होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यात जून-जुलै महिन्यात सातारा-देवळाई, बीड बायपास रोड, पैठण रोड, जालना रोड, जळगाव रोड, दिल्लीगेट ते हर्सल टी पॉइंट, नगर नाका ते पडेगाव-मिटमिटा या सहा रस्त्यांवरील सुमारे साडेपाच हजार अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे जमीनदोस्त केली.
ही. कारवाई कायम ठेवण्यासाठी पुन्हा दहा रस्त्यांवरील अतिक्रमणांचे नगर रचना विभाग व अतिक्रमण विभागाने मिळून टोटल स्टेशन सर्वेक्षण करून मार्किंग केली. मात्र, सणांमुळे आणि पोलिसांचे मनुष्यबळ मिळत नसल्याने ही कारवाई थांबली होती. मनपा प्रशासक जी. श्र्ीकांत यांनी अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, अतिक्रमण हटाव मोहिमेचे पदनिर्देशित अधिकारी संजय सुरडकर, सविता सोनवणे, संबंधित झोन कार्यालयाचे सहायक आयुक्त यांची बैठक घेत पुन्हा रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवण्याची सूचना केली. त्यासाठी टोटल स्टेशन सर्वेक्षण, मार्किंग, मालमत्ताधारकांना नोटीस ही रीतसर प्रक्रिया राबवूनच अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू केली.
या दहा रस्त्यांवर होणार पाडापाडी
पडेगाव-मिटमिटा मुख्य रस्ता ते गोल्फ कोर्स
शहर चौकी आणि नगरपालिका हद्द
कांचनवाडी मुख्य रस्ता ते लॉ विद्यापीठ
रेणुका माता कमान ते उमरीकर लॉन्स सातारा परिसर
हर्सल टी पॉइंट ते मनपा हद्द
सेव्हन हिल चौक ते भाजीवाली बाई पुतळा
महावीर चौक ते जळगाव टी पॉइंट (व्हीआयपी रोड)
चंपा चौक ते जालना रोड (तीन टप्प्यांत)
क्रांती चौक ते पैठणगेट
हसूल कारागृह ते अंबरहिल
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
पैठण गेटवर सोमवारी रात्री एका तरुणाचा भर रस्त्यात निर्घृणपणे खून करण्यात आला होता . या घटनेनंतर परिसरातील अतिक्रमणांवर एका समाजाने बोट ठेवले. त्यामुळे महापालिकेनेही तत्परतेने कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी या भागातील मुख्य रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर आज या भागातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सकाळीच सुरु करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
पैठणगेट परिसर मागील काही वर्षांत मोबाईल दुकानांचे हब बनला आहे. या ठिकाणी मोबाईल विक्रेते, दुरुस्ती, ॲक्सेसरीज विक्रीची दुकाने वाढली आहेत. सोमवारी रात्री 10:30 वाजता एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणाने इम्रान अकबर कुरैशी (33) याची दुकानासमोरच हत्या केली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कुरैशी समाजबांधवांनी मनपाच्या झोन क्रमांक 2 मध्ये ठिय्या आंदोलन केले. अतिक्रमित दुकानांची तक्रार केली. मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने ज्या दुकानांसमोर हत्या झाली, त्या दोन दुकानांवर नोटीस लावली. दोन दिवसांत मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगी मागितली.
दरम्यान मनपाच्या नगररचना विभागाने टोटल स्टेशन सर्वेक्षण केले. पैठणगेट ते सिल्लेखाना, पैठणगेट ते सब्जी मंडी व पैठणगेट ते खोकडपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर किती मालमत्ता रस्त्यात बाधित होतील,हे सर्वेक्षणानंतर ठरवण्यात आले आहे. पैठणगेट ते सिल्लेखाना चौक हा रस्ता 30 मीटरचा तसेच पैठणगेट ते सब्जी मंडी हा रस्ता 6 मीटरचा, पैठणगेट ते खोकडपुऱ्याकडे जाणारा रस्ता 15 मीटर रुंदीचा आहे. त्यानुसार रुंदीकरण केले जाणार आहे. नगर रचना विभागाचे राहुल मालखरे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांच्या पथकाने हे टोटल स्टेशन सर्वेक्षण केले. पैठण गेट येथील खुनाच्या घटनेनंतर अनधिकृत दुकानांचा मुद्दा कुरैशी समाजाने उपस्थित केला. त्यामुळे महापालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जात आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात येत आहे.















